Sunday, May 21, 2017

सिंगापुर ट्रिप

चला बॅग भरली आहे ना? तुमची तयारी झाली का? असे फोन चालू झाले आणि ट्रिप चे वारे सर्वांच्या अंगांत संचारू लागले. खूप दिवसाच्या कल्पनेतील विचारांना वास्तवाचे रूप येताना खूप समाधानी वाटत होते. थोडी चलबिचल पण होतीच कि कशी होणार ट्रिप, काही राहिले तर नाहीए ना प्लॅन मध्ये, तिथे गेल्यावर काही अनपेक्षित तर घडणार नाही ना  असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते.
प्रथम दर्शनी सिनियर सिटीझन साठी होऊ घातलेली आमची सिंगापुर ची सहल कधी सर्वांची झाली कळलेच नाही. आता अकरा जणांचा मोठा फॅमिली ग्रुप झाला होता. चेकलिस्ट प्रमाणे एक एक गोष्ट मार्गी लावत होतो. व्हिसा, फॉरेक्स कार्ड, इन्शुरन्स, एअर टिकेट्स, सिंगापुर मधील स्थानिक आकर्षण चे टिकेट्स, तेथील ग्राउंड ट्रान्सपोर्ट, ट्रिप चा दरम्यान हवामान कसे असेल, कोणते कपडे घ्यायेचे, बॅग चे वजन किती असावे, असे अनेक प्रश्न गुगल वरून सोडवत होतो. हि सहल आम्ही स्वतःच प्लॅन करत होतो त्यामुळे सगळे सोपस्कार कसे आणि कुठे करायचे हे पण पाहणे ओघाने आलेच होते. पण एक्सिटमेन्ट ने या गोष्टी वर मात केली.
एक दोन लांब लचक चर्चा सत्रांनंतर प्रत्येक दिवसाचा प्लॅन फायनल झाला. प्लांनिंग सेशनची पण एक वेगळीच गम्मत होती कारण यात टेकनॉलॉजि चा पूर्ण वापर केला होता, एक डोके पुण्यात एका टोकाला तर एक दुसऱ्या आणि तिसरे बंगलोरला! मग काय कॉन्फरेन्स कॉल विडिओ कॉल स्क्रीन वरून हे प्रकरण मार्गी लावले.  व्हिसा प्रोसससिंग छाया वेळेस कळले कि आम्ही तिघेच कनेक्टेड आहोत पण ग्रुप तर पुणे सोलापूर मुंबई मध्ये विखुरला आहे, मग परत टेकनॉलॉजि धावून आली आणि एक व्हाट्स अँप ग्रुपची निर्मिती झाली. सगळी माहिती पटापट मिळत होती.
२९ एप्रिल २०१७ हा दिवस नक्की झाला. एक  आठवडा अगोदर परंत सर्व ग्रुप मेंबर्स बरोबर कॉल ठेवला चेकलिस्टचे वाचन झाले आणि सर्व गोष्टी बरोबर आहेत ना याची खातर जमा केली. बॅग पॅकिंगच्या टिप्स ची देवाण घेवाण झाली, कोण काय खाऊ घेणार याचीही यादी झाली. इंडिगो चे विमान रात्री १ ला चेन्नई साठी जाणार होते आणि तिथून सिंगापुर ला. पण १ आठवडा अगोदर इंडिगो ने विमान रद्द केले आणि आम्हाला ११:३० चा ऑपशन दिला, पडत्या फळाची आज्ञा समजून आम्ही पण तयार झालो नाही तरी इतक्या कमी वेळात दुसरे तिकीट करणे शक्य नव्हते त्यापेक्षा २ तास जास्त वेळ एअरपोर्ट वर तिष्ठित काढणे परवडणारे होते!
२९ एप्रिल ला संध्याकाळी ७ वाजता पुणेकर दोन कॅब मधून एअरपोर्ट ला प्रयाण केले तो पर्यन्त मुंबईकर रेल्वे ने पुणे स्टेशन ला आणि तिथून एअरपोर्ट ला पोहोचले. एअरपोर्ट वर बॅग्स चेकिन केल्या वर पहिल्या सहभोजनाचा आनंद घेतला आणि एक सेल्फी चा कार्यक्रम झाला.:) पुण्याचा एअरपोर्ट एकदम पुणेरी आहे जणू तुम्ही शनिवार वाडा पायी हिंडून विमानात बसणार आहात.  एकदा विमानात विसावल्यावर चेन्नई येईपर्यन्त छोटी डुलकी झाली. चेन्नईला  उतरल्यावर बॅग्स घेऊन शटल घेऊन आंतरराष्ट्रीय हवाई तळावर गेलो परत बॅग्स चेक इन करून immigration चा कार्यक्रम उरकून (चेन्नईचे immigration एक दिव्यापेक्षा कमी नाही ) हवाई सुंदरी काही बोलावते याची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात चेन्नई वरून आम्ही सिंगापुरच्या दिशेने उड्डाण केले आणि सर्व जण उरलेली झोप पूर्ण करू लागले. साधारण दोन एक तासाने कृत्रिम नाजूक आवाजात हवाई सुंदरीने जागे केले ते ब्रेकफास्ट साठी. हो सिंगापुर आणि भारतीय वेळेत २ तासांचे अंतर आहे (ते पुढे आहेत) त्यामुळे आता तिकडचे १० वाजले होते आणि भारतातले ८. ब्रेकफास्ट नंतर परत एक डुलकी काढून होते तो पर्यन्त सिंगापुर मध्ये पोहोचणार असण्याची घोषणा पायलट ने केली. आमची घड्याळे लोकल वेळेनुसार सेट केली.

दिवस १
सिंगापुर ला उतरून परत एका रांगेत इम्मीग्रेशनचे सोपस्कार पार पडून बॅग्स घेतल्या. एरपोर्टवरच मोबाइलला सिम कार्ड घेतले आणि लगेच चालू पण झाले! एक सुखद अनुभव कि आऊट ऑफ इंडिया आलो याची खुण? एअरपोर्ट पासून हॉटेल पर्यन्त १३ सीटर बस अगोदरच बुक केली होती पण त्यामध्ये ९ लोकच बसू शकणार होते बाकी बॅग्स! मग दोघे दुसऱ्या एअरपोर्ट टॅक्सी ने मोठ्या गाडीच्या मागे असा प्रवास चालू झाला. खड्डे रहित रस्ते आणि ६० -७० चा स्पीड, १५ मिनिटात आम्ही हॉटेल च्या समोर होतो. पुण्यावरून येताना काही डॉलर्स घेतले होते ते टॅक्सीच्या कमी आले. इथे पण कार्ड आणि कॅश चा सीमा प्रश्न आहे याची कल्पना आली! एक ग्रुप आता हॉटेल चेक इन पाहत होता आणि एक पोटपूजेची तयारी करण्यासाठी गेला. आता आमचे एक एक मिनिट किमती होते कारण आमची प्लॅन पेक्ष्या जास्त वेळ एअरपोर्ट ची मजा घेतली होती. सगळ्या ग्रुप ला ४ ची वेळ देऊन हॉटेल च्या लॉबी मध्ये जमण्यास सांगितले. आज रिव्हर सफारी आणि जंगल नाईट सफारी प्लॅन वर होते. तोपर्यन्त एक मित्र सर्व टिकेट्स आणि घरगुती जेवण घेऊन हजर झाला, सगळे कसे प्लॅन प्रमाणे होत होते.  मित्र कडून रिऍलिटी टिप्स घेतल्या आणि फ्रेश होऊन आमच्या टॅक्सी वाल्याला फोन केला. सुदैवाने टॅक्सी वाला पण पंजाबी होता आणि तोच सगळ्या ट्रिप मध्ये आमचा सारथी झाला. 
प्रवासाचा क्षीण कि इंडियन स्टॅंडर्ड टाइम नक्की काय ते कळले नाही पण आम्ही ४ ऐवजी ४:४५ ला प्रस्थान केले. रिव्हर सफारी ला गेल्या वर चहा चा कार्यक्रम झाला आणि रिव्हर सफारी चालू केली. एकूणच आमच्या आळशी पणाची किंमत आम्हाला मोजावी लागली कारण रिव्हर बोट फेरी बंद झाली होती ६:३० वाजता. नेहमी प्रमाणे आम्ही विनंती विशेष सादर करून पहिले पण तसूभर हि दया माया न दाखवता फाटक बंद झाले. आता आमच्या कडे ७:३० पर्यन्त चा वेळ होता मग याचा पुरेपूर उपयोग करत आम्ही फोटो शूट केले!


आताच्या अनुभुवातून थोडे शहाणपण घेत आम्ही शार्प ७:३० ला नाईट सफारी ला पोहोचलो. तिथे एक लाइव्ह शो पहिला, कॉफी घेतली आणि सफारी ट्राम च्या रांगेत चालते झालो. आता हळू- हळू सर्वांना "सिंगापुर ला खूप चालावे लागते" याचा प्रत्यय येऊ लागला होता. तसा पहिला दिवस जरा ताणलेला होता. अर्धा पाऊण तास रांगेतून गेल्या वर ट्राम मध्ये (इलेक्ट्रिक ट्राम) बसण्यासाठी जागा मिळाली. आता ८:२० झाले होते चांगलाच अंधार पडला होता, दिवे नसलेली ट्राम संथ गती ने जंगलात मार्गक्रमण करत होती. हळुवार आवाजात चालणारी कंमेंटरी एक एक प्राण्याची ओळख करून देत होती, हाके एवढ्या अंतरावरून हे प्राणी पाहणे आणि सोबत रात किड्यांची साद एक वेगळाच अनुभव होता! इथे तुम्ही होप ऑफ करून चालत पण फिरू शकता पण एकंदरीत प्रवास आणि धावपळ पाहता कोणी तसे करण्यास धजावले नाही. नाईट सफारी करून सगळे जण दमले होते मग तडक तेथील इंडियन भोजनावर ताव मारला. तो पर्यन्त सिंग साहेबाना कल्पना दिली आणि आमची टॅक्सी रेडी होती. हॉटेल मध्ये जाऊन दुसऱ्या दिवसाची सकाळी ८:३० ची वेळ सर्वाना सांगून आम्ही मुले मुस्तफा मॉल मध्ये गेलो. तो मॉल एक वेगळेच विश्व आहे नक्कीच GPS वा मॅप्स ची गरज आहे तिथे. तुम्ही तिथे हरवून जाण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार! तेच आमचे झाले कधी रात्रीचा १ वाजला कळलेच नाही. हा मॉल आणि त्याचे कॅन्टीन २४ तास चालू असते, तिथेच एक चहा घेऊन हॉटेल वर जाऊन निद्रा देवतेच्या अधीन झालो.
दिवस २
दुसऱ्या दिवशी सिंगापुरची स्थानिक आकर्षण पाहण्याचा प्लॅन होता. दोघे जण ब्रेकफास्ट आणण्यासाठी गेले आणि दोघे मॉर्निंग अलार्म सारखे सगळ्या रूम्स ठोठावत... सिंग साहेब आज जातीने आले होते शार्प ८:३० ला. तरी आमचा ग्रुप IST प्रमाणे ९:१५ ला जमा झाला. एकंदरीतच सिंग साहेबानी आमचा उत्साह पाहून काही सूचना दिल्या पहिली गाडीत काही खाऊ  नका, रस्त्या वर कचरा टाकू नका नाही तर ३०० डॉलर फाईन आहे. आता बाखरवडी परत सॅक मध्ये गेली! पहिला पाडाव सिंगापुर फ्लायर होता. तिथे जाताना रॅफएल हॉटेल ला धावती भेट दिली. लंडन व्हील सारखेच हे फ्लायर पण आहे. पण त्याची सफर खूपच मस्त होती त्याची धीमी गती आपण कधी वर आलो आणि खाली कळूच देत नाही. तो दिवस छान सूर्यप्रकाशाचा होता त्यामुळे आम्ही पूर्ण सिंगापुर शहर पाहू शकत होतो.

तिथून आम्ही मुक्काम हलवला तो Merlion पार्कला तिथे येथेच्छ फोटो सेशन करून वळलो ते सुप्रीम कोर्ट आणि जवळचा परिसर(उओबी बिल्डिंग, सिटी हॉल, कॅव्हेनाघ ब्रिज) इथे मात्र आम्ही पायी फिरणेच पसंत केले. जरा ऊन होते पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीने बरे वाटत होते. इथेच आम्ही लोकल आईस्क्रीम टेस्ट केले.  आता पुढचा दिवस आम्ही एस्प्लनेड, हेलिक्स ब्रिज आणि गार्डन बाय बे साठी राखून ठेवला होता. पोटात कावळे पण ओरडत होते आणि टॅक्सी पण आली होती मग मोर्चा वळवला गार्डन बाय बे कडे!
गार्डन बाय बे मध्ये आम्ही आमची शिदोरी सोडली आणि पोटपूजा आटोपून घेतली, वन भोजनाचा आनंद घेतला आणि थोडी विश्रांती पण. तिथे असलेल्या दोन डोम(क्लाऊड फॉरेस्ट आणि फ्लॉवर डोम) पैकी आम्ही क्लाऊड फॉरेस्ट ची निवड केली कारण आम्हाला वेळ खूप होता आणि क्लाऊड फॉरेस्ट चे रेटिंग खूप चांगले होते. जसे आम्ही क्लाऊड फॉरेस्ट च्या डोम मध्ये पाय ठेवला एक सुखद धक्का बसला तो समोरचा मोठा धबधबा पाहून. हा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित धबधबा आहे.

 हे डोम मानवनिर्मित आहेत पण तुम्हाला खरेच ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये गेल्या सारखे वाटते. इथे  ३५ मीटर उंच डोंगर उभा केला आहे आणि टॉप ला जाण्यासाठी लिफ्ट पण अजून काय पाहिजे? परत येताना आपण एक एक मजला उतरत येतो तिथे पण observation deck आहेत जसे ग्रँड कॅनियॉन मध्ये आहेत, काचेचे प्लॅटफॉर्म. इथे मनसोक्त वेळ घालवून आम्ही बाहेरच्या गार्डन मध्ये आलो. मस्त कॉफी चा आस्वाद घेत छोटी मुले सायकलिंग कशी करत आहे ते पाहत होतो. नंतर मोर्चा वळवला तो सुपर ट्री कडे. आमच्या कडे आता दोन विकल्प होते १ सुपर ट्री चा लाईट आणि साऊंड शो पाहण्याचा नाही तर २ मरिना बे सँड्स समोर वॉटर शो. आम्ही सुपर ट्री लाईट शो पसंत केला आणि शो पाहून नक्कीच असे वाटले कि हा १०१ टक्के बरोबर निर्णय होता.

सुपर ट्री चा शो संपल्यानंतर आम्ही मरिना बे सँड्स चा रात्रीचा नजराणा पाहण्यासाठी गेलो. हॉटेल वर जाण्याची टॅक्सी येइ पर्यन्त पार्किंग मधल्या फेरारी चे फोटो काढले. रात्रीचे जेवण लिटिल इंडिया सर्वांना(sarvanna )भुवन मध्ये घेतले आणि चालतच विंडो शॉपिंग करत हॉटेल वर गेलो. जेवणावर चांगलाच ताव मारल्यामुळे लगेच झोप लागली.
दिवस ३
आजचा दिवस सेंटोसा साठी राखीव होता. सिंग साहेब सकाळी ९:१५ ला हजर होतेच. आम्ही पण जास्त वेळ न दवडता हार्बर फ्रंट कडे कूच केली. टिकेट्स अगोदरच बुक असल्याने तडक लिफ्ट ने टॉप फ्लोअर वर जाऊन सेंटोसा साठी स्काय लिफ्ट पकडली. सगळेच एकदम फ्रेश आणि उत्साही होते. आज जरा पाऊसाचा रागरंग होता आम्ही पण छत्री घेऊन सज्ज होतोच. इथे टोपी, छत्री आणि पाण्याची बाटली खूपच गरजेची आहे. स्काय लिफ्ट (रोप वे ) मधून समुद्राचे आणि सेंटोसा बेटाचे विहंगम दर्शन घेत आम्ही इम्बहीया लुक आऊट ला उतरलो.


इथे माहिती कक्षा मधून ऑनलाईन चे खरे तिकीट करून घेतले आणि मॅप पण! इथेच कॉफी शॉप मधून कॉफी घेत दिवसभराचा प्लॅन फिक्स केला. आता वेळ न दवडता टायगर टॉवर ची राईड घेतली आणि तो प्लॅन अगदी बरोबर होता कारण पाऊस चालू झाला होता. आता जरा प्लॅन मध्ये बदल करून इनडोअर ऍक्टिव्हिटी करण्याचे ठरवले. ४ डी गेम्स आणि शो पहिले, फुलपाखरू उद्यान पाहून तडक मर-लायन कडे गेलो. लिफ्ट ने त्याच्या डोक्यावर गेलो. तिथून पण आपण सेंटोसा पाहू शकतो अगदी बर्ड आय फ्रेम! इथेच मागे गार्डन मध्ये जेवण उरकून आम्ही SEA.aquarium  मध्ये गेलो. जेवणानंतर जरा एअर कंडिशन मध्ये गेल्यावर बरे वाटले आणि हे मस्त्यालय एकदम मोठे आणि सुंदर आहे यात वादच नाही. इतक्या मोठ्या अखंड काचांचे खूप अप्रूप वाटले. इथे तुम्ही स्टार फिश ला हात लावू शकता एकदम नवीन अनुभव!

आता चहाची वेळ झाली होती मग एक झक्कास चहा घेऊन मोर्चा वळवला तो थ्रिल्लिंग राईडस कडे... पहिली होती लुज राइड आणि एअर लिफ्ट ने परत आलो. नंतर आम्ही दोन ग्रुप मध्ये विभागलो. एक फ्री फॉल जंप आणि मेगा झिप राइड कडे आणि एक मादाम तुसाद संघरालयाकडे. मेगा राईडस खूपच मस्त होत्या पण रांगेत खूपच वेळ गेला. इथे ग्रुप मध्ये दूरसंवाद  खूपच गरजेचा होता पण आमच्या कडील ४ सिम कार्ड मुळे काहीच अडचण जाणवली नाही. तोपर्यन्त दुसऱ्या ग्रुप ने विंग ऑफ टाइम शो पाहून घेतला आणि क्षुधा शांती साठी कूच केली आणि पहिला ग्रुप शो साठी रवाना झाला. खरेच हा शो तुम्ही मिस करूच शकत नाही.

आता खूप उशीर झाला होता मग सिंग सारथ्याला फोन करून बोलावून घेतले आणि हॉटेल मुक्कमी आलो. बऱ्याच जणांनी गाडीचं एक डुलकी काढली. उतरल्यावर सर्वांनां बॅग पॅक करण्याच्या सूचना दिल्या आणि आमच्या पोटपूजेचा समाचार घेतला लिटल इंडिया मध्ये.
उद्या सर्वांनां एकच बॅग कॅरी करायची होती पुढील दोन अडीच दिवसासाठी. उगीच सर्व बॅग्स शिपवर नेऊन उपयोग नव्हता. मोठ्या बॅग्स आम्ही चायना टाउन मधील एका हॉस्टेल वर चेक इन करण्याचे ठरवले. तेथील रोजचे भाडे खूपच स्वस्त होते एअरपोर्ट पेक्षा. आता रात्रीचे १२:३० झाले होते आमची जेवणे आटोपून हॉटेल वर आलो आणि सॅक भरून ठेवली. इथे टी व्ही वर हिंदी चॅनेल दिसत होते तोच लावून बॅग पॅक झाल्या!
दिवस ४
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे नाश्ता घेऊन ९ ला आम्ही हॉटेल चेक आऊट केले. दोघे जण चालत (अर्धा किलोमीटर) अगोदरच हॉस्टेलच्या  ठिकाणी निघाले आणि बाकी सर्व बॅग्स बरोबर १३ सीटर ने हॉस्टेल वर पोहोचलो. तिथे मोठ्या बॅग्स लॉकर मध्ये ठेवल्यावर सर्व जण जुरांग बर्ड पार्क कडे रवाना झालो. साधारण ४० मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. कालच्या पावसामुळे आजची सकाळ खूपच चांगली वाटत होती. इथे आम्हाला वीणा वर्ल्डचा ग्रुप दिसला दोघांची वेळ मॅच झाली होती. गेल्यावर जुरांग पार्क चा मॅप घेतला आणि कितीवाजता कोणता शो कुठे आहे ते मार्क करून फेरी सुरु केली. पहिला डॉल्फिन शो पहिला नंतर घुबड दादांना अंधारात पाहून या पार्क चा प्रसिद्ध बर्ड शो साठी जागा पकडली. (सर्व शोचे रेकॉर्डिंग देत आहेच). इतके विविध पक्षी आणि त्यांना खुबीने ट्रेन केलेले पाहून डोळ्याचे पारणे फिटले. बोलणारा पोपट पाहून पु ला देशपांडेची आठवण झाली, इतके दिवस मी पण पु.  ल.  च्या गटात पोपट बोलू शकत नाही या मताचा होतो पण या शो नंतर ते साफ बदलून गेले!

इथे चालणं जीवावर आले असेल तर ट्राम ची पण सोय आहे. तीन स्टॉप असलेला ट्रामचा मार्ग सर्व पार्क ला एक चक्कर मारून आणतो फक्त तुम्ही तिकीट काढताना ट्राम सफर पण समाविष्ट करा.

आम्ही एक एक प्रकारच्या पक्षी विभागातून फिरत होतो, एके ठिकाणी बर्ड फीडिंगचा आनंद घेता येतो आणि हे पक्षी पण तुमच्या अंगाखांद्यावर लीलया येऊन आपल्याला त्यांच्यातील एक करून टाकतात. आता पार्क मधील धबधबा पाहून फ्लेमिंगो पार्क विभागात येऊन विसावलो. ऊन पण वाढले होते, ग्रुप आणि पर्सनल फोटो शूट करून पार्क चा निरोप घेतला. पुढील दिवस चायना टाऊन च्या पद भ्रमंती चा होता. मग बर्ड पार्कच्या जवळ असलेल्या इंडियन हॉटेल मध्ये जेवण करून चायना टाऊन कडे निघालो.


साधारण एक ते दीड किलोमीटर च्या या लूपला आम्हाला अडीच तास लागले सगळे ब्रेक घेऊन. इथे आम्ही बरच फोटो पण घेतले चिनी वास्तुकलेचे.

आता घड्याळ star cruise ची आठवण करून देत होते. आंमचे ५:३० ला चेक इन होते हार्बर फ्रंट ला, मग टॅक्सी करून हार्बर फ्रंट गाठले आणि चेक इन च्या लाईन मध्ये थांबलो.
बोर्डिंग पास घेतल्यावर एक चहा घेऊन इमिग्रेशनचे सोपस्कार(खरेच हे फार वेळ खाऊ प्रकरण आहे!) उरकून बोटीवर आलो. बोटी वर कॅप्टन ने नेहमीच्या सूचना दिल्या आणि आम्ही आपापल्या रूम्स मध्ये विसावलो. बोटीवरच्या आजच्या कार्यक्रमाची पत्रिका घेऊन कोणते आणि कुठे आहेत याची नोंद करून सर्व ग्रुप ला कल्पना दिली, आता प्रत्येक जण फ्री बर्ड होता, हो बोट खूपच मोठी आणि शानदार होती. कधी एकदा सर्व बोट फिरून येतो असे झाले होते. पाच हॉटेल्स आहेत हे कळल्यावर तर पोटात कावळे ओरडू लागले आणि तडक बाराव्या मजल्यावरील हॉटेल गाठले. थोडी (कारण पोटपूजा रात्री एक वाजेपर्यन्त चालणार होती) भूक भागवून, निरीक्षण कक्षा मधून अथांग सागरचा नजराणा पाहत बसलो. नंतर एक एक करत जिम, बास्केट बॉल कोर्ट, स्विमिंग पूल, शॉपिंग एरिया, मूवी हॉल, कॅसिनो असे पाहत पाहत रात्र कशी झाली कळलेच नाही. आता फ्रंट डेस्क ला जाऊन उद्याची मलेशिया टूर चे बुकिंग करून टाकले. हि बोट मलेशियाला सकाळी पोहोचणार होती मग "kuala lumpur" दर्शन आणि परत सिंगापुर ला येणार होती.










दिवस ५
 सकाळी परत टॉप डेक ला जाऊन चक्कर मारून आवरून सर्व जण ब्रेकफास्ट साठी गेलो. पोटभर ब्रेकफास्ट करून थोडी फ्रुटस आणि वॉटर पुढील दिवसासाठी स्टॉक करून ठेवले. तोपर्यंत मूवी हॉल मध्ये एकत्र जमण्याची वेळ झालीच होती. तिथे बेसिक सूचना दिल्या गेल्या आणि आमचा बस नंबर असलेला एक स्टिकर. बस नंबर प्रमाणे एक एक ग्रुप आपापल्या बस मध्ये गेला. पोर्ट पासून सिटी एक तासाच्या अंतरावर होती मग गाईड ची कंमेंटरी एन्जॉय करत आम्ही लोकल रोड पाहत मार्गस्थ झालो. इथे पण आपल्यासारखे टोल प्लाझा आहेत ठीक ठिकाणी पण रोडची तुलना नाही करू शकत इतके सुरेख कि पोटातील पाणी पण हलणार नाही, मल्टि लेवल फ्लाय ओव्हर पाहून कल्पना येते किती दूरचे प्लांनिंग केले आहे.
पहिला स्टॉप होता इंडिपेन्डेन्स ग्राउंड. हा तास एक फोटो पॉईंट आहे. नंतर आम्ही आलो ते के ल टॉवर ला. एका टेलिकॉम कंपनीची उंच बिल्डिंग, एके काळी(१९९५) सर्वात उंच ४२० मीटर असलेली इमारत. इथे आलो आणि गाईड बरोबर आम्ही टॉप फ्लोअरच्या निरीक्षण कक्षात स्पीड लिफ्ट ने गेलो. काही सेकंदातच टॉपला! कानाला दडी बसल्या सारखे झाले आणि वेगाची कल्पना आली. तोपर्यन्त पाऊस पण आला त्यामुळे खूप दूरची व्हिसिबिलीटी नव्हती. इथले फोटो शूट आटोपून बस मध्ये बसलो. आता ट्वीन टॉवर कडे निघालो तिथे पोहोचेपर्यन्त पाऊस गेला होता. एक मोठा दिलासा मिळाला. पेट्रोनस ट्वीन टॉवर ने आता जगातील एक सर्वात उंच इमारतीचा मान घेतला आहे. १९९८ ते २००४ मध्ये हीच जगात उंच इमारत होती ४५१.९ मीटर्स. लिफ्ट ने ४० व्या मजल्याला जात येत, पण आम्ही के ल मध्ये वर जाऊन आलो होतो मग इथे नाही गेलो. बाहेरून बरेच फोटो काढून झाल्यावर आत गेलो सुरिया मॉल मध्ये.

 मॉल मध्ये  विंडो शॉपिंग केल्या वर (हो शॉपिंग हा आमचा या ट्रिप चा उद्देश नव्हताच!) परत बाहेर येऊन आजूबाजूच्या बिल्डिंग पाहत चहाचा स्वाद घेतला. सर्व गाडीतले मेंबर्स आलेत याची खात्री करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आता मात्र ट्रॅफिक जॅमचा अनुभव पण आला. बोटीवर परत जाईतो वर ६:३० वाजले होते. बोटीवर जाताच हॉटेल मध्ये जाऊन छोटा नाश्ता घेऊन फ्रेश झालो. आता बोटीवरच्या कार्यक्रम पाहायचे होते. ८ ला सर्कस, ९:३० ला पियानो, १० ला जेवण अर्थातच पहिला राऊंड नंतर डेक वर गाणी, कराओके परत सेकंड राऊंड जेवणाचा आणि गप्पा. नंतर शॉपिंग एरिया मधला सेल पाहून आलो तोपर्यन्त १२ च्या मूव्हीची वेळ झाली होतीच. एक ग्रुप झोपायला गेला तर एक सिनेमाला!
 दिवस ६
उद्या बोटीवरून चेक आऊट होते मग काय उद्या रांगेत थांबू लागू नये यासाठी रात्री १ ला अर्ली चेक आऊट केले (बिल सेटलमेंट). सिनेमा नंतर मस्त ताणून झोपलो ते दुसऱ्या दिवशी ८ ला जाग आली. आज बारा एक ला परत जायचे होते मग लेट ब्रेकफास्ट चा प्लॅन करून थोडी फ्रुटस पण पॅक करून घेतली. तोवर पासपोर्ट घेतले आणि बॅग्स पॅक करून मूव्ही हॉल मध्ये येऊन बसलो. एक तास वाट पाहिल्यावर परत इमीग्रेशनची रांग जॉईन केली. या वेळी मात्र तब्बल दोन तासाने सुटका झाली! हार्बर फ्रंट ला सगळे मेंबर्स जमले आणि मस्त बर्गर वर ताव मारला.
क्षुधा शांती नंतर परतीच्या विमानासाठी ४तास होते, मग बुगीस मॉल पाहण्याचा प्लॅन करून, मेट्रो ने बुगीस स्टेशन गाठले. या ट्रिप मध्ये आम्ही कॅब , बस, विमान, बोट, रोप वे, मेट्रो अशा विविध साधनाने प्रवास केला. सिंगापुर मध्ये फिरण्यासाठी मेट्रो हा खरेच स्वस्त आणि मस्त ऑपशन आहे जर थोडी जास्त चालण्याची तयारी असेल तर. बुगीस मॉल खूपच मोठा आणि त्यालाच कनेक्टेड बुगीस प्लस मॉल यात कसे हरवून गेलो कळलच नाही. आता एका ग्रुप ला हॉस्टेल वरून बॅग्स घेऊन येणे क्रमप्राप्त होते, बुगीस जंकशन असल्याने दुसरा ग्रुप बाकी बॅग्स घेऊन स्टेशन वर बसेल आणि हॉस्टेल वरून येणारा ग्रुप तिथे जॉईन होवून एअरपोर्ट ला मेट्रो ने जाण्याचा प्लॅन करून, हॉस्टेल कडे कूच केली.
इथे थोडे वेळेचे गणित चुकले आणि बॅग्स घेऊन येण्यासाठी उशीर झाला. मग ठरल्या प्रमाणे एअरपोर्ट वर जेवणाचा प्लॅन कॅन्सल करून डायरेक्ट विमानाचे चेक इन चालू केले आणि लगेच सुरक्षा तपासणीची रांग जॉईन केली. नशिबाने आमचे जेवणाचे पार्सल विमानात घेऊन जाऊ दिले पण पाण्याची बाटली काढून घेतली. विमानात पण बाहेरचे खाणे मना असल्याने तीन तासची एक झोप काढून चेन्नईला एअरपोर्टवर येऊन जेवण केले रात्री १ ला! तशी बोटी मुळे आता सवय झाली होती लेट नाईट जेवणाची. आता ४ चे पुण्याचे विमान होते. काही जण एअरपोर्टच्या खुर्चीवर पहुडले तर काही ट्रिपचे फोटो मोबाइलवर पाहत बसले. आता कधी एकदा घरी जातो असे प्रत्येकाला वाटत होते. थोड्याच वेळात चेन्नई वरून विमान उडाले आणि दीड तासात पुण्यात दाखल झाले. पहाटेची ५:३० ची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. लगेच चेक इन बॅग्स क्लेम करून कॅब बुक केली. रस्ते पण मोकळे असल्याने अर्ध्या तासात घरी! अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी देऊन गेली हि सिंगापुर ट्रिप!!!
पुढच्या ब्लॉग मध्ये सिंगापुर ट्रिप प्लँनिंग कसे कराल याची माहिती देत आहे.